महाराष्ट्र

कोरोना प्रतिबंधात्मक आदेश जारी प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर’ पालन करा – जिल्हाधिकारी शैलेश नवाल

सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करणे बंधनकारक

हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट व बार आदीमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास कार्यवाही
लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त उपस्थिती आढळून आल्यास 50 हजार दंडासह फौजदारी गुन्हा
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कठोर होऊ नये यासाठी सर्व नागरीकांनी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर’ चे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.
May be an image of one or more people and indoor
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, बार, लग्न समारंभ, सर्व प्रकारची दुकाने आदींसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आज रात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल व मनपा प्रशासनाव्दारे विशेष पथके गठीत करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करावे, आपल्या सर्वांचे सहकार्याने व शासन, प्रशासनाच्या मदतीने आपण कोरोना विरुध्दची लढाई जिंकू शकू असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनमध्ये आज जिल्ह्यातील सर्व व्यापारी अशोसिएशन, ऑटोचालक, दुकाने, हॉकर्स, खासगी वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत प्रतिबंधात्मक आदेशा संदर्भात माहिती देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मनपा उपायुक्त रवि पवार यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.
May be an image of 1 person, sitting and indoor

सर्व दुकाने, आस्थापनांनी, खासगी वाहतूकदारांनी
प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन करा

जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे. लोक मास्क न लावता, सोशल डिस्टसिंगचे पालन न करता बिनदिक्तपणे फिरतांना दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी संक्रमितांचा आकडा वाढू नये म्हणून आज रात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशान्वये दुकाने, आस्थापना व इतर सेवा देणारे प्रतिष्ठाने आदींनी कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन 10 हजार रुपये दंड वसूली तसेच कलम 188 अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.
खासगी वाहतूक करणारे बस, ट्रॅव्हल्स, ऑटो चालक व इतर प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांनी जिल्ह्यात वाहतूक करतांना प्रवाश्यांनी तसेच स्वतऱ् मास्क लावणे बंधनकारक करावे. असे न केल्यास त्यांच्यावर 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, बारमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास कार्यवाही

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत अमरावती शहर व जिल्ह्यातील हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट व बार मालक, व्यवस्थापकांनी त्यांच्या प्रतिष्ठानामध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के च्यावर उपस्थिती असल्याचे आढळून आल्यास, प्रतिष्ठाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवल्यास, प्रतिष्ठानात प्रवेशित ग्राहकांना मास्क न लावता प्रवेश, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटॉयझेन आदी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन केल्यास संबंधित हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट व बार मालक, व्यवस्थापकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करुन 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल. तसेच सदरचे प्रतिष्ठान हे पुढील दहा दिवसांकरीता सीलबंद करण्यात येईल. ही कार्यवाही संबंधित कार्यक्षेत्रातील स्थानिक प्रशासनाव्दारे करण्याचे निर्देशित आहे.

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त उपस्थिती आढळून आल्यास 50 हजार दंडासह फौजदारी गुन्हा

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत या अगोदरही लग्न समारंभात फक्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी दिली होती. परंतू, लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्ती गर्दी करीत असल्याचे प्रशासनास आढळून आले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी सुध्दा आल्या आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी तसेच जिल्ह्यात वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक आदेश अन्वये कडक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अमरावती शहरात व जिल्ह्यातील विविध खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालये, हॉल, सभागृहे यामध्ये लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त उपस्थिती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालयाचे मालक, व्यवस्थापक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन किमान 50 हजार दंड वसूल करण्यात येईल. तसेच लग्न करणाऱ्या संबंधित वर वधू पक्षांवर सुध्दा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात येईल. सदर प्रतिष्ठान हे पुढील दहा दिवसाकरीता सीलबंद करण्यात येईल. लग्न समारंभाच्या प्रवेश स्थळी मास्क परीधान करणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आदी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना असणे बंधनकारक राहील.

गृह विलगीकरणातील व्यक्तीकडून बंधपत्र ; दुसऱ्यांदा आढळून आल्यास 25 हजार दंड

लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कार्यवाही व्हावी. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. त्यांच्यावर घरावर ठळक अक्षरात फलक लावून कुटूंबातील सर्व सदस्यांची तत्काळ कोरोना चाचणीसाठी तजवीज करावी. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणा-यांकडून बंधपत्र लिहून घ्यावे. एवढे केल्यावर ऐकून न घेता उल्लंघन करतांना दुसऱ्यांदा आढळून आल्यास त्याच्याकडून 25 हजार दंड वसूल करण्यात येईल. तसेच संबंधिताच्या मालमत्ता करमध्ये दंड नमूद केल्या जावून वसूल केल्या जाईल. त्याचे काटेकोर पालन होत नसल्यास किंवा संबंधितांनी यासाठी नकार दिल्यास त्यांना कोविड सेंटरला भरती करावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

जोखमीच्या क्षेत्रांत चाचण्या व सर्वेक्षण

केंद्रीय पथकाने आज भेट दिली व जिल्ह्यात काही जोखमीची क्षेत्रे आढळून आल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यांच्या सूचनेनुसार अशा परिसरात रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व गृहभेटींतून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. हवामानातील बदल, थंडीचे वाढलेले प्रमाण यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे कारण सांगितले जाते. संसर्ग हा एकदुस-यापुरता मर्यादित न राहता अख्खे कुटुंब संक्रमित झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या काळात लागण होण्याचे प्रमाण, विषाणूच्या संसर्गक्षमतेत वाढ आदी शास्त्रीय कारणे जाणून घेण्यासाठी त्याचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन- तीन दिवसांत प्राप्त होईल.
मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छतेचे नियम न पाळणा-यांवर दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके गठित करण्यात आली आहेत. त्यातून गत दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर दंडवसुली झाली आहे. त्याचप्रमाणे, मास्क नसलेल्यांना प्रवेश न देण्याबाबत शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, मंडळे, एस. टी. व इतर महामंडळे व सर्व विभागांना सूचित करण्यात येईल. रिक्षाचालकांकडूनही पालन होत नसल्यास स्वतंत्र ड्राईव्ह घेण्यात येईल. नागरिकांनी दक्षता त्रिसूत्री पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. नवाल यांनी यावेळी केले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!