चंद्रपूर: अन्न व औषध प्रशासन या कार्यालयाने विविध कारवाईत ताब्यात घेतलेला 72 लाख 40 हजार 481 किंमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, स्विट सुपारी, पानमसाला, खर्रा इ. पानमसाला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आज नष्ट केला. या पानमसाल्याचे वजन 48 हजार 659.27 किग्रॅ. होते.
सदर साठा कार्यालयीन वाहनांच्या सहाय्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे डम्पींग यार्ड, बायपास रोड, चंद्रपूर येथे नष्ट करण्यासाठी नेण्यात आला. डम्पींग यार्ड येथे जेसीबीच्या साहाय्याने 10 फुट खोल, 15 फुट लांब व 12 फूट रूंद खड्डा खोदून त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा टाकून जेसीबीच्या पंजाने पोते व बॉक्स यांना फोडण्यात आले. त्यानंतर सदर साठ्यावर पाण्याचा मारा करुन घनकचरा टाकून त्यावर जेसीबी फिरवून पृष्ठभाग समतल करण्यात आला.
सदर प्रतिबंधित साठा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, अन्न सुरक्षा अधिकारी प्र.अ.उमप, अ.या.सोनटक्के, जी.टी.सातकर व पंच साक्षीदार यांच्या समक्ष साठा नष्ट करण्यात आला.
Add Comment