चंद्रपूर : तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रत्यक्ष भेटी व निरीक्षणाच्या अनुषंगाने सध्या तुर पिक फुलोरा अवस्थेत आहे व त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची ( हेलीकोव्हर्पा ) अंडी व पहिली अळी अवस्था दिसुन येत आहे. शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या पाऊसमानामुळे तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडयातील हवामान हे अंशत: ढगाळ व रात्रीच्या वेळी तापमानात २ ते ३ डिग्री सें. ने घट होण्याची शक्यता आहे. असे हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणा या अळीच्या वाढीस पोषक आहे व त्यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्ंयापासून नुकसान होण्याची शक्यता आहे.
शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो. १.शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हर्पा) – या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठया अळ्या शेंगाना छिद्र करून आतील दाणे पोखरून खाता . २.पिसारी पतंग- या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाने पोखरते. ३.शेंगे माशी – या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो ह्या किडीचे मादी माशी शेंगेच्या आत आपली अंडी टाकते व अंड्यातून निघालेली अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची भुकनी होते.
एकात्मिक व्यवस्थापन- शेतकरी वर्गाने आपल्या पिकाची पाहणी करावी. शेंगा पोखरणारी अळी ३ प्रति झाड किंवा पिसारी पतंगाची अळी १ ते ३ प्रति झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगाचे नुकसान आढळल्यास पुढीलप्रमाणे व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. या किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.
१.प्रति हेक्टरी २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात. २.पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि (१४१० पिओबी / मिली ) ५०० एल.ई. / हे. किंवा बाँसिलस थुरिनजिएंसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., २० मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के डब्लुपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ३.दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी ) क्लोरॅनट्रनीप्रोल १८.५ टक्के एस.सी, प्रवाही ३ मिली किंवा इंडॉक्झीकार्ब १५.८ टक्के ईसी ६.६ मिली किंवा लॉब्डा सायहॅलोमेथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली किंवा फ्ल्युबंडामाईड २० टक्के डब्ल्युजी ५ ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीप्रोल ९.३० + लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन ४.६० झेडसी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
किटकनाशकांची फवारणी करतांना शिफारशीत मात्रेतच फवारणी करावी अन्यथा फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच किटकनाशकाचा वापर सतत करू नये. किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करूनच फवारनी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे, त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील, त्या गोळा करून नष्ट कराव्यात.
तरी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे किडीचे व्यवस्थापन करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
Add Comment