गेल्या काही महिन्यापासून रोज सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर 6 ते 8.30 दरम्यान पश्चिमेच्या आकाशात क्षितिजापासून 30 अंश उंचीवर दोन ठळक चांदण्या सारखे ग्रह दिसत आहेत. या दोन्ही चांदण्या म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठे दोन ग्रह गुरु व शनि आहेत. हे दोन्ही ग्रह दुर्बिणीशिवाय सहजपणे पाहता व ओळखता येतात त्यांपैकी मोठी चांदणी म्हणजे गुरु ग्रह तर छोटी चांदणी म्हणजे शनि ग्रह होय
गुरु हा सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह सुर्यापासून सरासरी 75 कोटी किमी दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 12 वर्षे लागतात तर शनि हा सुर्यमालेतील सर्वात सुंदर कडी असणारा ग्रह सुर्यापासून सरासरी 150 कोटी किमी दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 29.5 वर्षे लागतात . त्यामुळे पृथ्वीवरून रात्रीच्या आकाशात पाहताना त्यांची दर 20 वर्षांनी युती होतच असते. म्हणजे हे दोन्ही ग्रह जवळ आलेले दिसतात.
पण या दर वीस वर्षांनी होणाऱ्या युतीत गुरु व शनि विशिष्ट अंतरावर एकत्र येतात. मात्र या वेळी 21 डिसेंबर 2020 रोजी महायुती घडेल , म्हणजे गुरु व शनि एवढे एकत्र येतील कि दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून एकच चांदणी दिसू लागेल. आकाशात गुरु व शनिची ही अशी अवस्था दिनांक 20 , 21, व 22 डिसेंबर पर्यंत पाहायला मिळेल. यालाच गुरु व शनिची महायुती म्हणतात .हे ग्रह 400 वर्षापूर्वी म्हणजे 1623 साली असेच एकत्र आले होते आणि 2080 मध्ये पुन्हा एकत्र युतीत येणार आहेत म्हणूनच ही युती दुर्मिळ मानली जाते.
22 डिसेंबर नंतर गुरु ग्रह शनिला ओलांडून पूर्वेकडे वर सरकताना दिसेल त्या दोन्हीं ग्रहातील अंतर दिवसेंदिवस वाढत जाईल.
गुरु शनिच्या महायुतीची ही घटना 1623 साली घडली होती, त्यामुळे आपणाला या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची हीच एकमेव संधी आहे. तेव्हा ही संधी दवडू नका .
21 डिसेंबर पर्यंत या दोन ग्रहांतील अंतर सर्वाधिक कमी असेल परंतु पुढे आठवडाभर ही युती पाहता येणार आहे.
दुर्बीण असेल तर त्यातून हे ग्रह सुंदर दिसेल परंतु साध्या द्विनेत्रीने किंवा साध्या डोळ्याने अंधारातून ही युती चांगली पाहता येईल.
रात्रीच्या आकाशात अशा अभूतपूर्व घटना घडत असतात आणि विश्वातील अनेक सत्य व आश्चर्य मानवासमोर उलगडत असतात. आपण मात्र ग्रहताऱ्यांच्या अज्ञानापोटी अंधश्रद्धा जोपासत ग्रह ताऱ्यांना राशी नक्षत्रांना घाबरत राहतो आणि निसर्गाने बहाल केलेल्या विश्वाला समजून घेण्याच्या संधी अवैज्ञानिक भितीपोटी गमावत राहतो . शनि किंवा कोणताही ग्रह दुष्ट वाईत नसतो त्यामुळे ग्रहांबद्धल कुठल्याही अंधश्रद्धा बाळगू नये आणि ही युती आपण अवश्य पहावी असे आवाहन स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे.
अध्यक्ष –स्काय वाच गृप
Add Comment