महाराष्ट्र विदर्भ

शीतलची आत्महत्या नव्हे, संजीवन समाधी – डॉ. विकास आमटे

वरोरा :

    डॉ. शीतल आमटे करजगीने कमी वयात पाहिलेली भव्यदिव्य स्वप्ने साकारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत करीत प्राणार्पण केलं. जाण्यात आनंद वाटल्याने तिने संत ज्ञानेश्वर व सानेगुरूजींप्रमाणे संजीवन समाधी घेतली, असे मर्मस्पर्शी उद्गार महारोगी सेवा समितीचे सचिव तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी काढले. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्या डॉ. शीतल आमटे करजगी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आनंदवनातील श्रद्धावनात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय पोळ, सदाशिवराव ताजने, सुधाकर कडू, आंनदवनाचे कार्यकर्ते माधव कविश्वर, नरेंद्र देवघरे, गजानन वसू प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. आमटे यांनी पुढे बोलताना शीतल गेल्यावर ६ – ८ महिन्यांनी मलाही जगण्याची इच्छा नव्हती पण नंतर स्वत:ला सावरत उर्वरित आयुष्य बाबा आणि ताईंच्या स्वप्नपूर्तीसाठी झटण्याचा निर्धार केला, असे रहस्योद्घाटन केले. ते म्हणाले की, आनंदवनला ७५ वर्षे व हेमलकसा प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत याचे दस्तऐवजीकरण व्हायला पाहिजे. बाबांनी आपले चरित्र लिहिले नाही. त्यांना मागे वळून पाहण्यासाठी वेळ नव्हता. माझे वय ही ७५ वर्षे आहे. याच वयात बाबा आमटेंनी ” भारत जोडो ” यात्रा काढली, पंजाबला ते ६-६ वेळा गेले. नर्मदा येथे १२ वर्षे काढली, ते आपल्या मध्येही राहिले, म्हणून मी ठरविले की, पुढे जगून बाबा व ताईंची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जीवन हे क्षणभंगुर आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. भारत – बांग्लादेश सायकल यात्रेत सहभागी सामाजिक कार्यकर्ते विशाल अहिरे हे नुकतेच आनंदवनला भेट देऊन कलकत्त्याला पोहचले असता अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे नमूद करीत त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करून गतस्मृतींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरानंदवनच्या टीमने संत तुकडोजी महाराज यांची ‘ सबके लिये खुला है मंदिर ये हमारा ‘ व ‘ हर देश में तू, हर भेष में तू ‘ भजने सादर करून तर उपस्थित मान्यवरांनी दोन मिनिटे मौन धारण करून सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या आमटे कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीतील प्रतिनिधी डॉ. शीतल आमटे करजगी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी डॉ. सुहास पोतदार, डॉ. हर्षदा पोतदार, आनंदवनचे कार्यकर्ते एस. प्रभू, दीपक शिव, प्रमोद बक्षी, अशोक बोलगुंडेवार, राजेश ताजने, रोहीत फरताडे, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, सचिव राजेंद्र मर्दाने, डॉ. वाय.एस. जाधव, बंडू देऊळकर, शाम ठेंगडी, सरपंच रुपाली वाळके दरेकर, उपसरपंच शौकत खान, मुख्याध्यापिका विद्या टोंगे, विजय भसारकर, रूबिया खान, अविनाश कुळसंगे, स्वरानंदवन कलाकार, पत्रकार, आनंदवनातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संधी निकेतन अपंगांच्या कर्मशाळेचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांनी केले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!