चंद्रपुर :
ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या हस्ते ‘फोर्ब्स इंडिया’ यादीत मान मिळविलेल्या चंद्रपुर येथील भुमिपुत्र सारंग बोबडे यांचा आज (दि.२१) ला जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.
चंद्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणार्या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यवसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा ‘फोर्ब्स इंडिया’ यादीत मान मिळविला आहे.
भारतात नेत्रदीपक काम करणाऱ्या 30 व्यक्तींची यादी ‘फॉर्ब्स इंडिया’ या मासिकात प्रकाशित केली जाते. चंद्रपुरचा भूमिपुत्र सारंग बोबडेची या मासिकाने दखल घेतली असून त्याला भारतातील 30 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे. त्याने विकसित केलेल्या ‘डोनेटकार्ट’ या ऍपच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याची सोय झाली आहे. याची दखल ‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकाने जागतिक पातळीवर घेतली. या मासिकाने 2022 च्या अंकात भारतातील 30 वर्षाखालील युवकांच्या 30 जणांमध्ये एनजीओ अँड सामाजिक उद्योजकता गटाध्ये ‘सहसंस्थापक डोनेटकार्ट’ म्हणून अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे यांचा समावेश केला आहे. इतर दोघे हे अन्य राज्यातील आहेत.
मूळचे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी असलेले सारंगचे वडील कालिदास बोबडे हे चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय धानोरा-पिंपरी येथील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. तर आई याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सारंगचे दहावीपर्यंत शिक्षण चंद्रपूर येथील संस्थेच्या चांदा पब्लिक स्कूल मध्ये पूर्ण झाले. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर अनिल कुमार रेडी संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे हे त्रिकुट एकत्र आले. त्यांनी डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अतुलनीय कामगिरी करून हा लौकिक मिळविला. सारंगच्या या यशाविषयी त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना जेवण डबे उपलब्ध करून देणे. व देशाच्या विविध भागात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून या सारंग व त्याच्या मित्रांनी लक्षवेधी कामगिरी बजावली आहे.
यावेळी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य डॉ. आशीष महातळे, डॉ. कुंदन पाटील, प्रा. बोढाले, डॉ. बेग, डॉ. दुधपचारे, डॉ. मुकुंद शेंडे, डॉ. किशोर ठाकरे, डॉ. गोवारदीपे, सुभाष किन्नाके, डॉ. प्रविण जोगी, डॉ. मनिषा महातळे, डॉ. अमोल ढवस, प्रा. रवि जोगी, प्रा. विजय मालेकर, डॉ उमाकांत देशमुख, प्रा. ज्योती पायघन, डॉ. विकास उमरे, दिनकर अडबाले आदी अनेक प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या तर्फे सारंग बोबडे यांचा सत्कार


Add Comment