राष्ट्रीय

जैसलमेर येथील लोंगेवालामध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसह केलेल्या दिवाळी उत्सवात पंतप्रधानांचे भाषण

भारतमातेच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी 24 तास पाय रोवून उभे राहणाऱ्या आपणा सर्व शूरवीरांना पुन्हा एकदा माझ्याकडून एकशे तीस कोटी देशबांधवांच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. देशाच्या सीमेवर असो, आकाशात किंवा समुद्रावर, बर्फाळ शिखरांवर असो वा दाट जंगलांमध्ये देशाच्या संरक्षणात मग्न असलेले प्रत्येक शूर वीर मुले मुली आपल्या सेना, बी.एस. एफ, आय.टी.बी.पी., सी.आय.एस.एफ. प्रत्येक सुरक्षा दल, आपले पोलिस जवान, प्रत्येकाला मी आज दिवाळीच्या या पवित्र पर्वात आदरपूर्वक प्रणाम करत आहे.

आपण आहात तर देश आहे, देशातील लोकांचा आनंद आहे, देशातील हे सण आहेत. मी आज आपल्याकडे प्रत्येक भारतवासीयाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. आपल्यासाठी कोट्यवधी देशवासीयांचे प्रेम घेऊन आलो आहे. प्रत्येक वयोवृद्धाचा आशीर्वाद आपल्यासाठी घेऊन आलो आहे. मी आज त्या वीर माता-भगिनी आणि मुलांना दीपावलीच्या हार्दिक शुभकामना देत आहे, त्यांच्या त्यागाला नमस्कार करत आहे ज्यांचा स्वतःचा मुलगा वा मुलगी आज सणाच्या दिवशीही सीमेवर तैनात आहेत. अशा कुटुंबातले सर्वचजण या सन्मानाचे अधिकारी आहेत. पुन्हा एकदा दोन्ही मुठी वळवून पूर्ण शक्तिनिशी माझ्या बरोबर म्हणा भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.

मित्रहो, माझ्या लक्षात आहे, पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा 2014 दिवाळीच्या दिवसांमध्ये मी सियाचिनला गेलो होतो. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी, तेव्हा बऱ्याच जणांना थोडं आश्चर्यच वाटलं होतं. सणांच्या दिवसात पंतप्रधान हे काय करत आहेत. परंतु आता मात्र आपणही माझ्या भावना जाणता. दिवाळीच्या दिवसांमध्येच तर आपल्या माणसांमध्ये जाणार ना! आपल्यांपासून दूर कसं, कुठे राहणार. म्हणूनच आज सुद्धा दिवाळीच्या  दिवसांमध्ये आपणा सर्वांकडे आलो आहे. आपल्या माणसांमध्ये आलो आहे. आपण भले बर्फाळ शिखरांवर असा किंवा वाळवंटात, माझी दिवाळी आपल्याकडे आल्यावरच साजरी होते. आपल्या चेहऱ्यावर पसरलेला प्रकाश बघतो, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बघतो तेव्हा मलाही कित्येक पटीने आनंद मिळतो. माझा आनंद वाढत असतो. या आनंदासाठी, देशवासीयांचा उल्हास आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पुन्हा एकदा या वाळवंटामध्ये, आपल्या माणसांमध्ये आलो आहे आणि सणांचे दिवस आहेत म्हणूव मी आपणासाठी थोडी मिठाईसुद्धा घेऊन आलो आहे. परंतु हा काय फक्त देशाचा पंतप्रधान मिठाई घेऊन आलेला नाही.  माझेच नाही तर सर्व देशवासीयांचे प्रेम आणि आपलेपणाचा स्वाद या सोबत घेऊन आलो आहे. या मिठाईत आपणाला देशातील प्रत्येक आईच्या हातांची गोडी अनुभवता येऊ शकेल. या मिठाईत आपल्याला प्रत्येक भावंडांच्या आणि वडिलांच्या आशीर्वादाची जाणीव होईल . मी आपल्याबरोबर देशाचे आपल्याप्रती  असलेले प्रेम, स्नेह आणि आपल्यासाठीचा आशीर्वाद सुद्धा सोबत घेऊन येतो

आणि मित्रहो

मी आज लोंगेवाला या पोस्टवर  आहे. आता देशातील सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळल्या आहेत. भारतमातेच्या लाडक्या मुलांनो, माझ्या या मुली, माझ्या देशाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या या मुली माझ्यासमोर बसल्या आहेत. त्यांच्यावर देशाचे लक्ष आहे. मला वाटते की देशाच्या सीमेवरच्या ज्या कुठल्या जागेचे, पोस्टचे    नाव लोकांना सर्वाधिक माहित असेल,  पिढ्यानपिढ्या माहित असेल तर ते म्हणजे लोंगेवाला पोस्ट,  प्रत्येकाच्या जिभेच्या टोकावर असणारे हे नाव. अशी जागा जिथे उन्हाळ्यात तापमान 50 डिग्री पर्यंत पोचते तर थंडीत शून्याच्या खाली जाते. तर मे-जून मध्ये वाळू अशी काही वाहत सुचते की एकमेकांचा चेहरा ही दिसत नाही. या पोस्टवर आपल्या साथीदारांनी शौर्याची अशी काही गाथा लिहिली आहे जी आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जोश भरते. लोंगेवाला हे नाव घेताच हृदयाच्या गाभाऱ्यातून जे बोल प्रकट होतात ‘जो बोले सो निहाल सत् श्री अकाल’ हा जयजयकार कानात घुमू लागतो.

मित्रहो ,

जेव्हा जेव्हा लष्करी कौशल्याच्या इतिहासाबाबत लिहिले जाईल, वाचले जाईल, जेव्हा जेव्हा लष्कराच्या पराक्रमांची चर्चा होईल तेव्हा तेव्हा ‘बॅटल ऑफ लोंगेवाल’चे नक्कीच स्मरण केले जाईल. हा असा काळ होता जेव्हा पाकिस्तानची सेना बांगलादेशातील निर्दोष नागरिकांवर अत्याचार करत होती, जुलूम करत होती, नरसंहार करत होती.  माताभगिनींवर अमानुष अत्याचार  पाकिस्तानच्या सेनेतील लोक करत होते. या गोष्टींमुळे पाकिस्तानचा घृणास्पद चेहरा प्रगट होत होता. जगासमोर पाकिस्तानचे भयंकर रूप प्रत्यक्ष दिसत होते. या सर्वांवरून जगाचं लक्ष दूर करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या देशाच्या पश्चिमी सीमेवर मोर्चा उघडला. पाकिस्तानला वाटले होते की भारताच्या पश्चिम सीमेवर मोर्चा उघडू, आणि जगभर भारताने हे केले, भारताने ते केले म्हणून रडगाणं गात राहू तर त्यामागे बांगलादेशात करत असलेली सारी पापे दृष्टीआड होतील. पण आमच्या सैनिकांनी जो काही तोडीस तोड प्रतिकार केला तेव्हा पाकिस्तानला पळता भुई थोडी झाली.

मित्रहो इथे या सीमा चौकीवर दाखवल्या गेलेल्या पराक्रम, ज्यामुळे  शत्रूंचे मनसुबे धुळीला मिळाले. त्यांना कुठे माहिती होतं की त्यांचा सामना भारतमातेच्या पराक्रमी मुला-मुलींशी आहे. मेजर कुलदीप सिंह चांदपुरीच्या नेतृत्वाखाली भारतीय वीरांनी रणगाड्यांसह आलेल्या शत्रू सैनिकांना धुळीला मिळवले त्यांचे मनसुबे नेस्तनाबूत केले. कधीकधी मला वाटतं की कुलदीप यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव कुलदीप ठेवले होते. त्यांना वाटले असेल की हा आपल्या कुळाचा दीपक आहे पण त्या कुलदीपकाने आपल्या पराक्रमाने त्या नावाला अशा तऱ्हेने सार्थक केले, अशा असा काही अर्थ दिला कि ते फक्त कुलदीप नाही तर राष्ट्रदीप  झाले.

मित्रहो लोंगेवाला ऐतिहासिक युद्ध भारतीय सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक आहेच पण स्थलसेना, सीमा सुरक्षा दल  आणि वायुसेना यांमधील अद्भुत समन्वयाचेसुद्धा प्रतीक आहे.  भारतातील संघटित लष्करी शक्तीसमोर  कोणत्याही परिस्थितीत कोणीही आले तरी  टिकाव धरू शकणार नाही हे या लढाईने दाखवून दिले. आता वर्ष 1971 मध्ये झालेल्या युद्धाला, लोंगेवाला मध्ये झालेल्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत.  पुढील काहीच आठवड्यांमध्ये आपण हे पन्नासावे वर्ष, हे गौरवपूर्ण सोनेरी पान साजरे करणार आहोत म्हणूनच इथेच यावे असे माझ्या मनाला वाटले. जो  देश आपल्या त्या वीरांच्या विजय गाथा ऐकून गौरवान्वित होईल त्यांचे उद्देश बुलंद असतील. नवीन पिढी आणि येणाऱ्या पीढ्यांना या पराक्रमापासून प्रेरणा घेता यावी एवढे हे क्षण त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. अशाच वीर सुपुत्रासाठी राजस्थानातील भूमीतील एका कवीने, नारायण सिंह पाटी ने लिहिले आहे. हे गीत बोलीभाषेत लिहिले आहे त्यांनी लिहिले “इन जैसे घर, इन जैसे गगन, इन जैसे सह-इतिहास! इन जैसी सह-पीढ़ियाँ, प्राची त्रणे प्रकाश!!’ म्हणजेच आपल्या वीर सूत्रांच्या बलीदानाचा या धरणीला अभिमान वाटतो. जोपर्यंत सूर्याची किरणे या धरणीवर अंधाराला पळवून लावण्यासाठी प्रकट होत राहतील तोपर्यंत येणाऱ्या पिढ्या या बलिदानाला  अभिमानाने मिरवतील.

मित्रहो,

हिमालयाची शिखरे असोत, वा वाळवंटातील वाळूच्या टेकड्या, दाट जंगले असतील किंवा  खोल समुद्र तळ , प्रत्येक आव्हानांवर आपले शौर्य स्वार होते. आपल्यापैकी अनेक मित्र  जे आज इथे वाळवंटात पाय रोवून उभे   आहेत त्यांनी हिमालयातील उंचीचासुद्धा अनुभव घेतला आहे. परिस्थिती कोणतेही असो आपला पराक्रम आपले शौर्य अतुलनीय आहे याचाच परिणाम असा आहे की आज शत्रूलाही ही जाणीव आहे की भारतातील पराक्रमी वीरांची बरोबरी करता येऊ शकत नाही. आपल्या या शौर्याला नमस्कार करत आज भारताचे एकशे तीस कोटी देशवासीय आपल्या सोबत  उभे आहेत. आज प्रत्येक भारतवासीयाला आपल्या सैनिकांची ताकद आणि शौर्याचा अभिमान आहे. आपले अजिंक्य असणे ,आपले  अपराजेय असणे याचा त्यांना अभिमान आहे. जगातील कोणतीही शक्ती आमच्या शूर सैनिकांना देशाचे संरक्षण करण्यापासून  रोखू शकत नाही, विचलित करू शकत नाही.

मित्रांनो,

दुनियेचा इतिहास पाहिला तर आपल्याला सांगतो की, केवळ असेच राष्ट्र सुरक्षित राहिले आहेत, असेच राष्ट्र पुढे गेले आहेत, ज्यांच्यामध्ये संकटांचा सामना करण्याची क्षमता होती. जर आजचे दृश्य पाहिले तर मग आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही प्रकारे केले जात असो, कितीही समीकरणे बदलली तरीही आपण काही गोष्टी कधीच विसरू शकत नाहीत. सतर्क, दक्ष राहणे म्हणजेच सुरक्षेचा मार्ग आहे. सजग राहण्यानेच सुखात जगणे शक्य होणार आहे. सामथ्र्य हेच विजयाचा विश्वास आहे. सक्षमता म्हणजे शांतीचा पुरस्कार आहे. भारत आज सुरक्षित आहे, कारण भारताजवळ आपली सुरक्षा राखण्याची शक्ती आहे. भारताकडे आपल्यासारखे वीर पुत्र आणि कन्या आहेत.

मित्रांनो,

ज्यावेळी गरज निर्माण झाली, त्या त्यावेळी भारताने दुनियेला दाखवून दिले की, आपल्याकडेही ताकद आहे आणि योग्य, सडेतोड उत्तर देण्याची राजनैतिक इच्छाशक्तीही आहे. आमच्या सैन्याच्या ताकदीमुळे आमची वाटाघाटीची शक्तीही अनेकपटींनी वाढवली आहे. सैन्याचा पराक्रम वाढला, त्यांची संकल्प शक्ती वाढली आहे. आज भारत दहशतवाद्यांना आणि दहशतवाद घडवून आणणा-यांच्या घरामध्ये घुसून नामोहरम करतो. आज दुनियेला हे चांगलेच माहिती झाले आहे की, हा देश आपल्या हिताविषयी कोणत्याही किमतीवर अगदी रतीभरही समझौता करणारा नाही. भारताचा हा थाट, ही शक्ती, भारताने आपल्या पराक्रमाने कमावलेली ही क्षमता, ताकद, शक्ती आहे. आपला देश आज सुरक्षित केला आहे म्हणूनच आज भारत वैश्विक मंचावर प्रखरतेने आपले म्हणणे ठाम मांडू शकतो.

मित्रांनो,

आज संपूर्ण विश्व विस्तारवादाच्या शक्तींमुळे त्रासून गेले आहे. विस्तारवाद, ही एकप्रकारे मानसिक विकृती आहे. आणि अठराव्या शताब्दीमधील वैचारिक दृष्टीकोण त्यातून दिसतो. अशा विचारांच्या विरोधातही भारत आपला आवाज अधिक प्रखर बनवत आहे.

मित्रांनो,

आज भारत अतिशय वेगाने आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी पावले उचलत आहे. पुढे जात आहे. अलिकडेच आमच्या सेनेने आत्मनिर्भर बनण्याचा निर्णय घेतला आहे. मला चांगले ठाऊक आहे की, आत्मनिर्भर भारत बनविणे हा एक खूप मोठा आणि  प्रोत्साहन देणार निर्णय आहे. परंतु सेनेच्या या निर्णयाने देशवासियांमध्ये, 130 कोटी देशवासियांमध्ये अतिशय प्रभावी संदेश गेला आहे. हा संदेश खूप दूरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. हा संदेश आहे, लोकलसाठी व्होकल झाले पाहिजे. सेनेच्या एका निर्णयामुळे 130 कोटी देशवासियांना लोकलसाठी व्होकल होण्याची प्रेरणा मिळाली आहे. देशाच्या नवयुवकांनी, देशाच्या सेनेने, सुरक्षा दलांनी, निमलष्करी दलांनी, एकापाठोपाठ एक याच प्रकारे निर्णय घेतले आहेत आणि त्या अनुकूल भारतामध्ये वस्तूंचे उत्पादन करायला लागले आहेत. मला विश्वास आहे की,  माझ्या देशाचे युवक अशा काही गोष्टी, उत्पादने तयार करतील, अशा काही नवनवीन वस्तू आता आणतील की, आमच्या सैनिकांची, आमच्या सुरक्षा दलांच्या सैनिकांची ताकद त्यामुळे वाढेल. अलिकडेच अनेक स्टार्ट-अप्स ,सेनेच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे आली आहेत. संरक्षण क्षेत्रामध्ये नवतरूणांच्या नवीन स्टार्ट-अप्समुळे देशाला आत्मनिर्भर बनवून ते वेगाने पुढे घेवून जातील.

मित्रांनो,

देशाची अखंडता, देशवासियांच्या एकतेवर अवलंबून असते. शांती, एकता, सद्भावना देशामध्ये देशाच्या अखंडतेला एक प्रकारे शक्ती देत असते. सीमेची सुरक्षा, सुरक्षा दलांच्या शक्तीशी जोडलेली आहे. सीमेवर आमच्या पराक्रमी सैनिकांचे धैर्य मजबूत असावे, त्यांचे मनोबन अगदी आकाशापेक्षाही उंच असावे, यासाठी त्यांना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणे हे आज देशाच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य असलेले कार्य आहे. याचबरोबर त्यांच्या परिवाराची देखभाल करणे, ही सुद्धा देशाची जबाबदारी आहे. अलिकडच्या काळामध्ये सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी तसेच रोजगाराविषयी अनेक निर्णया घेतले आहेत. गेल्या वर्षी ज्यावेळी मी दुस-यांदा शपथ घेतली होती, त्यानंतर पहिला निर्णय हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासंबंधित होता. या अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा निधीमधून मिळणा-या छात्रवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

मित्रांनो,

सुविधेबरोबरच वीरांच्या सन्मानासाठीही देशामध्ये अभूतपूर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक असो अथवा राष्ट्रीय पोलिस स्मृतीस्थळ असो, ही दोन्ही स्मारके देशाच्या शौर्याचे सर्वोच्च प्रतीक बनून देशवासियांना, आपल्या नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत.

मित्रांनो,

कठिण, आव्हानात्मक परिस्थितिमध्ये आपले आचरण, आपल्या समूहाचे काम, देशाला प्रत्येक आघाडीवर लढण्याची ताकद देत असते. आज देशात  याच भावनेने कोरोनासारख्या महामारीच्या विरोधात लढा देत आहे. देशातले हजारो डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय मदतनीस आणि पुरक सेवा देणारा कर्मचारी वर्ग रात्रंदिवस, अथकपणे निरंतर कार्य करीत आहेत. देशवासीही या लढाईमध्ये आघाडीवर असलेल्या यौद्ध्यासारखे  कार्य करीत आहेत. गेले काही महिने  आपले देशवासी संपूर्ण शिस्तीचे पालन करून, मास्क वापरण्याची दक्षता घेवून तसेच इतर नियमांचे पालन करून स्वतःची आणि आपल्या नातेवाइकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आता आम्हाला असे ही जाणवते की, जर आपल्याला एक साधा मास्क वापरण्यासाठी इतका त्रास सोसावा लागतो, तर मग तुम्हा सैनिकांना हे सुरक्षा जाकीट तसेच इतर कितीतरी सुरक्षा साधने घेवून वावरावे लागते. हे सगळे शरीरावर लादताना किती त्रास होतो आणि हे सगळे घालणे किती अवघड असते,  याची जाणीव आता आम्हालाही होऊ लागली आहे. आपण करीत असलेल्या या त्यागामुळे देश शिस्तही शिकत आहे आणि सेवा धर्माचेही पालन करायला लागला आहे.

मित्रांनो,

सीमेवर राहून आपण जो त्याग करीत असता, जी तपस्या करीत असता, त्यामुळे देशामध्ये एक विश्वासाचे वातावरण तयार होते. प्रत्येक हिंदुस्तानीमध्ये एक नवीन आत्मविश्वासाचा स्तर निर्माण करतो. अशा विश्वासामुळेच मोठ मोठ्या संकटांचा सामना करणे शक्य होत असते. आपल्याकडून मिळणारी प्रेरणा देशाला या महामारीच्या संकट काळामध्ये आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी मदत करणारी ठरते आहे. इतक्या महिन्यांपासून देश आपल्या 80 कोटींपेक्षा जास्त नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करीत आहे. त्याचबरोबर देशाला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पुन्हा एकदा गती देण्यासाठी संपूर्ण शक्तिनिशी प्रयत्नही सुरू आहेत. देशवासियांच्या मजबूत मनोबलाचा परिणाम म्हणजे आज अनेक क्षेत्रांमध्ये पुन्हा एकदा विक्रमी ‘रिकव्हरी’ आणि वृद्धी होताना दिसून येत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया, त्यामध्ये मिळणारे यश, याचे सगळे श्रेय सीमेवर खडा पहारा देत असलेले आमचे शूरवीर जवान यांना जाते. आपणा सर्वांना हे श्रेय आहे.

मित्रांनो,

प्रत्येकवेळी, प्रत्येक सणाला, ज्यावेळी मी आपल्यामध्ये येतो, जितका वेळ आपल्यामध्ये घालवतो, आपल्या सुख-दुःखामध्ये सहभागी होतो, राष्ट्र रक्षणाचा, राष्ट्र सेवेचा माझा संकल्प तितकाच मजबूत होतो. मी आपल्याला पुन्हा एक आश्वस्त करू इच्छितो की, आपण अगदी निश्चिंतपणे कर्तव्याच्या पथावर मजबुतीने उभे रहा. प्रत्येक देशवासी आपल्याबरोबर आहे. हो, आजच्य दिवशी मी आपल्याबरोबर एका मित्राच्या रूपामध्ये, एक सहकारीच्या रूपामध्ये तीन गोष्टींचा आग्रह करणार आहे, आणि मला विश्वास आहे, आपण माझा हा आग्रह कदाचित आपल्यासाठी एक संकल्पही बनू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे- काही ना काही नवीन करण्याची सवय लावून घ्यावी, किंवा नवीन पद्धतीने काहीतरी करण्याची सवय लावून घ्यावी, नवीन गोष्ट शोधून काढण्याच्या सवयीला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवावा. आणि मी पाहिलं आहे की, अशा प्रकारे जीवन जगणा-या आमच्या सैनिकांची ‘क्रिएटीव्हिटी’ देशासाठी खूप काही नवीन गोष्टी घेऊन येऊ शकते. आपण थोडे लक्ष द्यावे, आणि काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या लक्षात येईल, आमच्या सुरक्षा दलांना जाणवेल. कारण आपल्या अनुभवाच्या आधारे नवसंकल्पना करणे शक्य असते. रोजच्या कामामध्ये आपल्याला अनेक कष्ट घ्यावे लागता, तेच काम नव्या पद्धतीने केले तर कमी त्रास होईल. त्याचा खूप मोठा लाभ होतो. माझा दुसरा आग्रह आहे, तो म्हणजे – आपण सर्वांनी योग आपल्या आयुष्याचा अभिन्न भाग बनवावे. कितीही अवघड असले तरीही योग जीवनाचा भाग बनला पाहिजे. तिसरा आग्रह म्हणजे आपल्या सर्वांची मातृभाषा आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक हिंदी बोलतात, तसेच आपल्यापैकी काही जण इंग्लिशही बोलतात. या भाषांबरोबर तर आपले स्वाभाविक नाते असते. परंतु ज्यावेळी असे सामूहिक जीवन असते, त्यावेळी तर माझ्यासमोर एक छोटा भारतच बसलेला असतो. देशाच्या कानाकोप-यातून आलेले नवयुवक आत्ता समोर आहेत. वेगवेगळी मातृभाषा असणारे नवयुवक आहेत. अशा वेळी माझा एक आग्रह आहे की, आपली मातृभाषा, तुम्ही जाणत असलेली हिंदी भाषा आणि इंग्लिश या सोडून आणखी एखादी वेगळी भाषा जाणून, शिकून , आत्मसात करावी. नवीन भाषा जरूर शिकावी, आपली ही एक मोठी ताकद बनेल. आपण हा प्रयोग जरूर करून पहावा. या गोष्टींमुळे आपल्यामध्ये एक नवीन शक्ती निर्माण होईल.

मित्रांनो,

जोपर्यंत आपण आहे, आपल्याकडे हे प्रचंड धैर्य, धाडस आहे, आपला हा त्याग आहे, तपस्या आहे, 130 कोटी भारतवासियांच्या आत्मविश्वासाला कोणीही तडा देवू शकणार नाही. जोपर्यंत आपण आहे, तोपर्यंत देशाची दिवाळी अशीच झगमगती राहील. लोंगेवालाच्या या पराक्रमी भूमीवरून वीरता आणि साहस दाखविणा-या या भूमीवरून, त्याग आणि तपस्येच्या या भूमीवरून मी पुन्हा एकदा, आपल्या सर्वांना आणि देशवासियांना दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर, पूर्ण ताकदीनिशी, दोन्ही मुठी उंचावून अगदी पूर्ण क्षमतेने जयघोष करावा, भारत माता की जय ! भारत माता की जय! भारत माता की जय!!!

खूप – खूप धन्यवाद !!

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!