Breaking News पोलीस रिपोर्टर

नातवाने आजोबाची हत्या करून घरीच पुरला मृतदेह

चंद्रपूर:- आजोबाची नातवानेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला. त्यानंतर काही झालेच नाही, अशा तोऱ्यात आरोपी राहू लागला. मात्र, शंकरपटाच्या निमित्ताने आरोपीची आई लाडबोरीला आली आणि तब्बल ४५ दिवसांनी मंगळवारी हत्येचे बिंग फुटले. पोलिसांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून आरोपीला अटक केली.

आरोपीच्याच आईच्या तक्रारीवरून आरोपी असलेल्या नातवाला अटक करण्यात आली आहे. सूरज सुधाकर सेलकर (वय २५, रा. बेंबाळ, ता. मूल ) असे आरोपीचे नाव आहे, तर कवडू देटे (७५, रा. लाडबोरी) असे मृताचे नाव आहे. आरोपी सूरज हा आपल्या आईच्या वडिलांकडे म्हणजे मृत कवडू देटे यांच्याकडे मागील काही दिवसांपासून राहत होता. पैशावरून आरोपी सूरज व मृत कवडू देटे यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी सूरज व कवडू देटे यांच्यात वाद झाला. यात सूरजने आजोबा कवडू देटे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह घरासमोरील मातीत पुरला.

दरम्यान घटनेच्या ४५ दिवसांनंतर सोमवारी आरोपीची आई शंकरपटानिमित्त लाडबोरी येथे आली. घरात दुर्गंधी येत असल्याचे तिला जाणवले. काही ठिकाणी रक्ताचे डागही आढळले. शिवाय वडील कवडू देटे हेदेखील दिसत नसल्याने तिला संशय आला. तिने याबाबत सूरजला विचारले असता सूरजने हत्येची कबुली दिली. आईच्या तक्रारीवरून मंगळवारी सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला व आरोपी सूरज सेलकर याला अटक केली आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत

error: Sorry !! Content is Copyright protected !!